‘My World’ is a series of insights on gender issues by the people for the people

Dr. Sangita Todmal-Ingulkar, has a Ph.D. in “Effects of Environment on Public Health and Social Life”. Originally from Ahmednagar, Maharashtra, India, she currently resides in Frankfort, Kentucky, USA.A former media person who worked in audio-visual and print media for 15 years.A scholar, writer, motivational speaker has written this article in Marathi , her mother tongue.

. स्त्रीवाद


"स्त्रीवाद" (Feminism) हा शब्द हल्ली बऱ्याचदा ऐकायला येतो. स्त्रीवाद म्हणजे नेमके काय? "स्त्रियांनी पुरुषांशी बरोबरी करणे म्हणजे स्त्रीवाद" अशी ढोबळमानाने व्याख्या केली जाते. काही स्त्रीवादी संघटना तर आत्यंतिक टोकाची भूमिका घेऊन प्रत्येकच गोष्टीत बरोबरी किंवा वरचढपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कितीही झाले तरी स्त्रिया पुरुषांप्रमाणे दाढी-मिशा वाढवू शकणार नाहीत आणि पुरुष गर्भधारणा करू शकणार नाहीत. हे निसर्गाने निर्माण केलेले फरक आहेत आणि यात बरोबरी होऊ शकणार नाही. मग "स्त्रीवाद" कशाला म्हणायचे? वास्तविक स्त्रीवाद म्हणण्यापेक्षा माझ्या मते "स्त्री-पुरुष समतावादाचा" आग्रह धरणे जास्त योग्य राहील. कारण आदर्श जगात स्त्री आणि पुरुष दोघांनाही बरोबरीचे स्थान असणे अपेक्षित आहे.

आज जगातील बहुतांश देशांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशातही स्त्रियांना मतदानासारख्या न्याय्य हक्कासाठी लढा द्यावा लागला होता आणि तो देश अजूनही पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाच्या प्रतीक्षेत आहे. आशियाई आणि आखाती देशांत तर स्त्रियांची परिस्थिती आणखीनच बिकट आहे. जगाने स्त्रीला एक व्यक्ती न मानता कायमच एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले आहे. त्यामुळेच तर आज एकविसाव्या शतकातही एखाद्या वस्तूप्रमाणे स्त्रियांची खरेदी-विक्री होते आणि हे फार दुर्दैवी आहे.

भारतासारख्या देशात तर स्त्रियांच्या आणखीनच वेगळ्या समस्या आहेत. स्त्रीच्या जन्माच्या आधीपासूनच तिच्या अस्तित्वावर घाला घातला जातो आणि भ्रूणहत्या केली जाते. बऱ्याचदा या कामी इतर स्त्रियाच हातभार लावत असतात. "स्त्रीलाच स्त्रीचे अस्तित्व नकोसे वाटावे" इतकी नकारात्मकता समाजाने त्यांच्या मनावर बिंबवली आहे. "बाईच्या जन्माला येण्यापेक्षा मेलेले बरे" असा भयंकर विचार करावासा वाटणे हे कोणत्याही संवेदनशील मनाला पटेल काय? यानंतरही जर मुलीचा जन्म झाला तर आनंद होण्यापेक्षा आई-वडिलांना चिंताच जास्त वाटते. मुलगा म्हणजे "म्हातारपणाची काठी" आणि मुलगी म्हणजे "परक्याचे धन/कर्जाचा डोंगर" अशा पद्धतीचा विचार केला जातो. वास्तविक नुकत्याच जन्मलेल्या बाळाकडून अशा प्रकारच्या कोणत्याही अपेक्षा ठेवणे पूर्णतः चुकीचे आहे. आताच आपल्या म्हातारपणासाठी आधार शोधणे हे आपल्याच कर्तृत्वशून्यतेचे द्योतक नाही काय? आणि गरज पडलीच तर मुली हा आधार होऊ शकणार नाहीत काय?

जन्मानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे बालपण. या बालवयातही मुलींना बऱ्याच भेदभावाला सामोरे जावे लागते. सर्वप्रथम बऱ्याच मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. महात्मा फुले - सावित्रीबाई फुले आणि तत्कालीन समाजसुधारक यांच्या कार्यामुळे माझ्यासारख्या काही मुलींना आज शिक्षण मिळू शकले. परंतु ग्रामीण भागात अजूनही कित्येक मुलींना चूल आणि मूल यातच राबवले जाते. तसेच शहरी भागातही आर्थिक अडचणींमुळे अधिक गुणवत्ता असलेल्या मुलीला केवळ मुलगी आहे म्हणून डावलले जाते आणि तिच्या भावाला - एका मुलाला प्राधान्य दिले जाते. हा मुलींवर केला जाणारा अन्यायच आहे.

आणखी एक थोडा वेगळा मुद्दा म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींनाही एका वेगळ्या प्रकारच्या भेदभावाला सामोरे जावे लागते. बहुतेक शाळांमध्ये मुला-मुलींना वेगवेगळे बसवले जाते. जशी दोन मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये मैत्री असते तशीच निकोप मैत्री एक मुलगा आणि मुलगी यांच्यातही असू शकते. परंतु तसे वातावरण शाळांमध्ये निर्माण केले जात नाही. याचा परिणाम मुलांवरही होतो. बरीच मुले यामुळे मुलींपासून दूर राहून लाजरी बुजरी बनतात व पुढे मुलींशी उत्तम प्रकारे संवाद साधू शकत नाहीत. तर काही मुले दडपण्यामुळे मुलींकडे अधिकच आकर्षित होतात आणि त्यातूनच मग विनाकारण अंगचटीला जाणे, नको तिथे मुलींना स्पर्श करणे अशा विकृती तयार होऊ लागतात. हे टाळता यावे यासाठी शालेय जीवनात मुला मुलींमध्ये निकोप मैत्रीला वाव दिला पाहिजे.

तरुण वयात तर मुलींवरची बंधने आणखीनच कडक होतात. हे करू नको, इथे जाऊ नको, असे बोलू नको, असे बसू नको, असले कपडे घालू नको, मुलांशी बोलू नको, रात्री बाहेर जाऊ नको अशी कितीतरी बंधने आपण मुलींवर लादतो. याउलट मुलांना बरीच मोकळीक असते. यातून खरे म्हणजे नकळत आपण पुरुषी अहंकाराचे बीज मुलांमध्ये रुजवत असतो. पुढे जाऊन तोच मुलगा मग बायकोवर सत्ता गाजवू पाहतो आणि यात त्याला काहीच वावगे वाटत नाही. 'वातावरण चांगले नाही त्यामुळे मुलींच्या सुरक्षेसाठी अशी बंधने घालावी लागतात' अशी सबब सांगितली जाते. पण मुलींसाठी आपण सुरक्षित वातावरण निर्माण करू शकत नाही ही एक समाज म्हणून आपल्या सर्वांसाठी शरमेची गोष्ट आहे. बंधने घालून मुलींना भित्रे बनवण्यापेक्षा त्यांना स्वयंसुरक्षेचे प्रशिक्षण देऊन कणखर केले पाहिजे. तसेच समाजाचाही दृष्टिकोन बदलला पाहिजे. दुर्दैवाने एखाद्या स्त्रीवर अतिप्रसंग झाला तर समाज गुन्हेगाराला शिक्षा देण्याऐवजी पीडितेलाच दूषणे देत बसतो. चित्रपटासारख्या माध्यमांनीसुद्धा प्रबोधन करण्याऐवजी अशा अयोग्य विचारांना खतपाणी घातले आहे. ८०-९० च्या दशकातील हिंदी सिनेमे आठवा. बलात्कारित स्त्री मान खाली घालून रडत गल्लीमधून घरी जात असते आणि आजूबाजूचे लोक आधार देण्याऐवजी टोमणे मारत असतात. शेवटी ती स्त्री आत्महत्या करते असे प्रसंग अतिरंजित करून दाखवले जातात. वास्तविक बलात्कारित स्त्रीला अधिक कणखर आणि समाजाला अधिक संवेदनशील दाखवायला हवे ज्याने लोकांच्या मनोवृत्तीवर सकारात्मक परिणाम होईल. बऱ्याचदा गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी मुलींच्या वेशभूषेला दोष दिला जातो. कोणी काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु यामुळे जर एखाद्याला आपल्या वासानांना आवर घालता येत नसेल तर हे त्याच्या बुरसट मनोविकृतीचे लक्षण आहे. दुर्दैवाने राजकारणी, उच्चपदस्थ व्यक्तीसुद्धा कसलीही संवेदनशीलता न दाखवता अशा घटनांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करतात. 'Justice delayed is justice denied' हे लक्षात घेऊन वास्तविक कायदेशीर यंत्रणांनी अशा केसेस मध्ये अधिक विलंब न लावता गुन्हेगारांना कडक शिक्षा करायला हवी जेणेकरून अशा प्रकारांना खीळ बसेल.

याचप्रमाणे तरुण वयात मुला मुलींना योग्य लैंगिक शिक्षण देणेही अतिशय गरजेचे आहे. मासिक पाळी म्हणजे नेमके काय हे देखील कित्येक पुरुषांना माहीत नसते. मग मासिक पाळीच्या वेळी आपल्या पत्नीला होणारा त्रास पुरुषांना कसा समजणार?

मुलगी वयात आली की मग तिचे लग्न लावून जबाबदारीतून मोकळे होण्याची आई वडिलांना घाई असते. त्यामुळे शिक्षण संपल्यावर चांगल्या करिअरच्या तिच्या वाटा बंद होतात. हुंडा, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ या समस्या तर सर्वांना माहीत आहेतच. याव्यतिरिक्तही बरेच अन्याय विवाहित स्त्रीवर होत असतात ज्यावर फारसा कुणी विचार करत नाही. दिवसभर ऑफिसला जाऊन आले तरी सर्व घरकाम पत्नीनेच करायला हवे अशी बऱ्याच पुरुषांची अपेक्षा असते. गृहिणींना तर सर्वच बाबतीत गृहीत धरले जाते. अनेक महत्वाचे निर्णय केवळ एकटा पुरुष घेत असतो. वास्तविक महत्वाचे आर्थिक निर्णय पती-पत्नी दोघांनी एकत्रित विचार करून घेतले पाहिजेत. पण 'तुला काय कळतंय यातलं?' असा विचार करून स्त्रियांना गप्प केले जाते. पतीच्या निधनानंतर पतीचे बँक खाते कुठे होते हेही कित्येक स्त्रियांना माहीत नसते अशी उदाहरणे मी पहिली आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे विवाहित स्त्री जेवढ्या समर्पण भावनेने सासरच्या मंडळींना आपलेसे करते तेवढी जवळीक पुरुष पत्नीच्या आई-वडीलांविषयी दाखवत नाही. यातूनही बऱ्याचदा पती पत्नीमध्ये खटके उडत असतात. याबाबतीत पुरुषांनी आपली मानसिकता बदलायला हवी.

विवाहित स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार हे देखील बऱ्याचदा दिसून येत नाहीत पण होत असतात. दिवसभर काम करून थकल्यामुळे संभोगाची इच्छा नसतानाही त्यांना पतीच्या जबरदस्तीला सहन करावे लागते. पत्नी म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा संभोग करण्याची वस्तू अशी मानसिकता बऱ्याच पुरुषांची असते. त्यातून जर पतीच्या वासना विकृत स्वरूपाच्या असतील तर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची आपण कल्पनाही करू शकत नाही. पतीने केला असला तरी यालाही बलात्कार म्हणतात आणि कायद्याने यापसून आपल्याला संरक्षण आहे हे कित्येक सुशिक्षित स्त्रियांनाही ठाऊक नसते. तसेच लग्न झाले की 'नवऱ्याचे घर हेच तुझे कायमचे घर' अशी आई वडिलांची मानसिकता असल्यामुळे मुली याबतीत आपल्या आई-वडिलांशीही मन मोकळे करत नाहीत आणि 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' सहन करत राहतात.

ऑफिसात जाणाऱ्या स्त्रियांनादेखील त्यांच्या कार्यक्षेत्रात बरेच भेदभाव सहन करावे लागतात. त्या अकार्यक्षम आहेत असाच बऱ्याच पुरुष सहकाऱ्यांचा पूर्वग्रह असतो. उच्च पदावर असलेल्या स्त्री कडून आदेश - सूचना ऐकून घेताना कित्येकदा पुरुष सहकाऱ्यांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो आणि ते योग्य सहकार्य करत नाहीत. गर्भधारणेच्या काळात स्त्री कमीत कमी १ वर्ष तरी काम करू शकणार नाही म्हणून गुणवत्ता असूनही त्यांना डावलले जाते. वास्तविक प्रसूतीच्या काळात स्त्रीला पतीची सर्वाधिक गरज असते. मुलाला जन्म देणे ही जबाबदारी निसर्गतः स्त्रीला दिली असली तरी त्याकाळात तिचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक ऱ्हास होत असतो आणि म्हणून पतीचे सहकार्य अपेक्षित असते. शेवटी मुलाला जन्म देणे आणि त्याचे संगोपन करणे ही दोघांची एकत्रित जबाबदारी आहे. म्हणूनच खर म्हणजे सरकारने कायदा करून स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही पत्नीच्या प्रसूती वेळी सुट्टी देणे बंधनकारक करायला हवे. तरच कामाच्या ठिकाणी होणारा हा भेदभाव कमी होईल.

उतारवयात शेवटी थकलेल्या पतीला आधार देत आणि मुलाच्या संसाराची घडी बसवून देण्यात हातभार लावत तिचे आयुष्य संपून जाते. या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला स्वतःसाठी मोकळेपणाने फारसे कधी जगताच येत नाही. हा दैनंदिन जीवनात अनुभवास येणारा भेदभाव संपवून टाकणे म्हणजे खरा "स्त्रीवाद"!

हा लेख कदाचित एकांगी वाटू शकेल आणि समाजात अनेक पुरुष याला अपवाद आहेत. नवीन पिढीतील सुशिक्षित तरुण याबाबतीत अधिक सजग आहेत. परंतु बहुतांश समाज याच विचारधारेचा आहे. तरीदेखील सर्वश्रुत असलेल्या स्त्री विषयक समस्यांवर लिहिण्याऐवजी वरवर दिसून न येणाऱ्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वरवर पाहता एखादी गोष्ट ठीक वाटत असली तरी वरचा थर उलगडून अंतरंग पाहिल्यावर स्त्रीला जाणवणारा भेदभाव विषद करण्याचा प्रयत्न केला आहे.

आध्यात्मिक पातळीवर विचार केला तर स्त्री आणि पुरुष ही समाजाची अविभाज्य अंगे आहेत. पुरुष हे शिवाचे तर स्त्री हे शक्तीचे प्रतीक आहे. शिव-शक्तीची अनेक रूपे या विश्वात आपल्याला दिसून येतात. अगदी लहान अणू - रेणू पासून ते मोठ्या ग्रहगोलांपर्यंत! उदाहरणार्थ - अणूचा केंद्रक (Nucleus) - शिव तर इलेक्ट्रॉन - शक्ती. ब्रह्मांडामध्ये सूर्य - शिव तर पृथ्वी - शक्ती. शिव स्थिर, potential तर शक्ती चर, kinetic. या शिव-शक्तीच्या एकत्रीकरणातूनच विविध कार्य पार पडत असतात. अगदी सध्या चालण्याच्या क्रियेचे उदाहरण घ्या. चालताना एक पाय जमिनीवर घट्ट स्थिर ठेवावा लागतो (शिव) तेव्हा दुसरा पाय मागे-पुढे (चर) करता येतो (शक्ती). शिव-शक्ती शिवाय चालणे अशक्य आहे. त्यामुळे पुरुष आणि स्त्री दोघांशिवाय हा संसाराचा हा गाडा चालणे अशक्य आहे आणि दोघांचेही महत्व बरोबरीचे आहे. हेच सर्वांनी जाणून घेतले पाहिजे.

"संवेदना" म्हणजे दुसऱ्याची वेदना दुःख समजून घेणे. "संवेदना" ही संस्था स्त्रियांचे दुःख समजावून घेऊन त्याचे निराकरण करेल आणि अधिक समतावादी आदर्श समाज निर्मितीसाठी प्रयत्न करेल अशी मी अपेक्षा करते. या कामासाठी आणि पुढील वाटचालीस "संवेदना" संस्थेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि हो, लागेल तेव्हा मदतीचे आश्वासनही!185 views0 comments